GALLNUTS or Mayphal or Majuphal
GALLNUTS or Mayphal or Majuphal is eccentric fruit typically found in and around only Sahyadri Mountain Range or popularly known as Western Ghats in Maharashtra with life span of around 500 years. This tree has been categoried as vulnerable for being rare and on the verge of extinction.
Dhananjay Patil
7/28/20241 min read


मायफळ
सह्याद्रीत आढळणाऱ्या जायफळाच्या तीन सख्ख्या भावंडांपैकी एक – मायफळ. गर्द सदाहरित दलदल अथवा घनदाट जंगलांत बारमाही झऱ्यांच्या, पाणवठ्यांच्या आसपास आढळणारा, सावकाश वाढणारा, मात्र कदाचित ५०० वर्षांपेक्षाही अधिक आयुष्य लाभलेला हा अती दुर्मिळ वृक्ष पश्चिम घाट वगळता अन्यत्र जगाच्या पाठीवर कुठेही आढळत नाही. ( IUCN Red List )
International union for conservation of nature
एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्यांच्या शृंखला तयार करतात. त्या नुसार सध्या हे झाड 'vulnerable' ( असुरक्षित ) वृक्षांच्या यादीत आहे.
रानात हा वृक्ष सहसा एकटा दुकटा दिसत नाही. त्याचे सगळे कुटुंबच एकत्र नांदत असते. आई, बाबा, मुले, मुली... हो खरंच! या वृक्षात नर-मादी झाडे वेगवेगळी असतात. नर वृक्षास फळे लागत नाहीत. मायफळ जुलै महिन्याच्या सुरुवातील फुलोऱ्यावर येतात. फुले आल्यापासून फलधारणा होणे आणि फळे पक्व होई पर्यंत साधारण १ वर्ष कालावधी जातो. त्यामुळे मादी झाडे वर्षभर छोटू फळांचे संगोपन करण्यात ‘बिझी’ असतात!
मायफळाच्या फळाची संरचना काही औरच असते. बाहेरून फळावर मातकट भगव्या रंगाचे वेलवेट आवरण. त्याखाली अर्धा-पाउण सेंटीमीटर जाडीची, बाहेरून गुळगुळीत हिरवट करड्या रंगाची साल. त्याखाली पिवळीधम्मक नाजूक रामपत्री. नंतर पुन्हा एक पातळ दुधाळ पापुद्रा. मग त्याखालीकाळी - हिरवट - चकचकीत मात्र जुनाट वाटावी अशी दंडगोलाकार लाकडी बीजकुपी आणि या लाकडी कुपीच्या आत निसर्गाने सुरक्षित दडवून ठेवलेले मायफळ बीज.
झाडावरून पूर्ण पक्व होऊन खाली पडलेल्या बियांत २५-३०% पाणीच असते. बियांची रुजवण क्षमता जास्तीत जास्त १० दिवसांपर्यंत असते. म्हणूनच त्या ताजोताज रुजत घालणे आवश्यक आहे. बिया गोळा केल्यापासून रुजत घालेपर्यंत या बियांना पाण्याच्या संपर्कात ठेवणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा त्या सुकून जातात. २ आठवडे कोरड्या ठिकाणी बीज साठवून ठेवून नंतर रुजत घातले तर एकही बी रुजत नाही. मायफळ बीज या लाकडी आवरणास आतून एके ठिकाणी चिकटलेले असते. मादी फुलातील अंडकोशात जोडली गेलेली ही नाळ आतल्या बीजास घट्ट पकडून ठेवते. बी कानाजवळ हलवली आणि खुडू खुडू असा आवाज आला तर बीज मृत असल्याची शक्यता अधिक असते. असे बी रुजत नाही. जायफळ बिया रुजवणाऱ्या काही तद्न्य शेतकऱ्यांचादेखील असाच अनुभव आहे. बिया हलवल्या आणि आवाज न आल्यास बी ची रुजण्याची शक्यता अधिक. धनेश पक्षी मायफळातील रामपत्री अत्यंत आवडीने खातात. पावसाळ्यात मायफळे पिकू लागली की या पक्षांचे अक्षरशः थवे या झाडांवर असतात. झाडावरून खाली पडलेल्या बियावरील पिवळीधम्मक रामपत्री काही खेकडेदेखील आवडीने खातात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की मायफळचा सख्खा भाऊ, Myristica fatua च्या बीवरील ही रामपत्री खाता यावी म्हणून हे खेकडे खाली पडलेली ६०% हून अधिक फळे आपल्या पुढच्या पंजात पकडून खाली बिळात घेऊन जातात. कितीतरी बिया अशाप्रकारे जमिनीखाली सुरक्षित राहतात ज्या कदाचित जमिनीवर राहिल्या असत्या तर त्यातील काही भरपूर पावसात वाहून गेल्या असत्या किंवा कदाचित काही कीटकांनी किंवा अन्य कुणा शाकाहारी प्राण्यानी कदाचित रामपत्री सहित गट्टम केल्या असत्या! जमिनीखाली गेलेल्या या बियांपैकी अनेक बियांची सुरक्षित रुजवण होते. खेकड्याची भूक भागते आणि झाडाचे प्रजोत्पादनदेखील साध्य होते. निसर्गाने या वृक्षाच्या बीज प्रसारासाठीच तर ही रामपत्री तयार केली नसावी नं! किती नानाविध पशु, पक्षी, कीटक ही फळे खात असावेत आणि अप्रत्यक्षपणे झाडाच्या प्रजोत्पादनास मदत करीत असावेत कोण जाणे. माकडे आणि वानर मात्र ही फळे खात असल्याचे कधी ऐकले नाही. मानवासाठी देखील या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. दक्षिण कोकण प्रदेशात ज्या शेतकऱ्याजवळ ही झाडे आहेत त्यांना एका झाडापासून किमान ८०० ते १००० रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळते. या झाडाचे धार्मिक महत्वदेखील आहे.
सध्या मायफळ रोपे मोठ्या प्रमाणावर जायफळाचे कलम बांधण्यासाठी वापरली जातात. मात्र मायफळसारखे कोकणातील दुर्मिळ मसाला पिकदेखील शेतकऱ्यांसमोर लागवड दृष्टीकोनातून येणे गरजेचे वाटते. मायफळाचे स्वतःचे वेगळे मार्केट आहे. स्वतःची आंगची निराळी चव, निराळा स्वाद आहे. अनेक औषधी गुणधर्म आहेत. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देण्याची क्षमता आहे. कलम करण्याच्या नादात मायफळाची स्वतःची स्वतंत्र ओळख आणि उपयुक्तता झाकोळत चालली आहे. यावर खरच लक्ष देण्याची गरज आहे.
औषधी उपयोग
१) ताप, कफ वगैरे जास्त असेल तर रामपत्री प्राथमिक घरगुती औषध म्हणून दिली जाते.
२) बियांमधील तेल संधिवात व स्नायू दुखीवर, लचक अथवा पाय वगैरे मुरगळल्यास लावले जाते.
३) मसाल्यातदेखील रामपत्रीस स्वतंत्र वेगळे स्थान आहे.
#मायफळ_पर्यावरण_संवर्धन_समिती
***माहिती संकलन
@पर्यावरण संवर्धन समिती
९८९०३४१११०